
Pune Metro Ganeshotsav | पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. मानाच्या गणपतींच्या प्रतिष्ठापना आणि मिरवणुकांमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.
सध्या पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या सुमारे 2.15 लाख इतकी आहे. मात्र गणेशोत्सवाच्या काळात ही संख्या 5 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी मेट्रो प्रशासनाने काही ठराविक मार्गांवर पर्यायी स्थानकांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
प्रवाशांसाठी मार्गदर्शन :
पिंपरी-चिंचवड मनपा ते स्वारगेट मार्गिकेवरील प्रवाशांनी गणपती दर्शनासाठी कसबा पेठ स्थानक वापरणे सुचवले आहे. या स्थानकातून विविध मानाच्या गणपती मंडळांपर्यंत पायी जाता येते.
वनाज ते रामवाडी मार्गिकेवरील प्रवाशांनी पुणे महानगरपालिका, छत्रपती संभाजी उद्यान किंवा डेक्कन जिमखाना स्थानक वापरावीत. विशेष म्हणजे, अत्यंत गर्दीची शक्यता लक्षात घेता मंडई स्थानक वापरणे टाळावे, असे मेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवाशांसाठी सूचना:
– तिकीट खरेदीसाठी डिजिटल तिकीट, व्हॉट्सअॅप तिकीट किंवा वन पुणे कार्ड वापरण्याचा सल्ला
– लिफ्टचा वापर वृद्ध, महिला आणि गरजू प्रवाशांसाठीच राखून ठेवावा
– शिस्तबद्ध रांगेत प्रवेश व निर्गमन करावा
– अनावश्यक गर्दी किंवा थांबणे टाळावे