
Shrigonda News । श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणी फराटे यांच्या कथित भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम कारभाराविरोधात माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांनी अहिल्यानगर येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण केले. फराटे यांच्या तातडीने बदलीची मागणी करताना त्यांनी रोजगार हमी योजना आणि पंधराव्या वित्त आयोग निधीतील गैरव्यवहारांचा जाहीर पर्दाफाश केला.
म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राणी फराटे यांनी रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरी आणि गाय-गोठ्यांच्या प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांशी आर्थिक व्यवहार करून बोगस बिलांचे भुगतान केले. यामुळे गरजूंना लाभ मिळाला नाही. यापूर्वीही लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलने केली, परंतु कारवाई झाली नाही. तसेच, महिला बचत गटांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. फराटे यांच्यावर कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देण्याचा आणि ठेकेदारांची अडवणूक करण्याचा आरोप आहे. सामान्य प्रशासन विभागातील चार कनिष्ठ सहाय्यकांपैकी दोघांनी जाचाला कंटाळून राजीनामे दिले, तर दोघांनी बढतीनंतरही रुजू न होण्याचा निर्णय घेतला. समाज कल्याण विभागात वारंवार चार्ज बदलून ठेकेदारांना त्रास दिला जातो, असेही म्हस्के यांनी नमूद केले.
फराटे या मुख्यालयी राहत नसून पुणे जिल्ह्यात वास्तव्यास असतात आणि शासकीय वाहनांचा गैरवापर करतात, असा आरोप आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासणीतही त्यांच्या अनुपस्थितीची दखल घेतली गेली, परंतु कारवाई झाली नाही. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतही भ्रष्टाचार झाल्याचा दावा म्हस्के यांनी केला. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सर्व मुद्दे मांडले असून, कारवाई न झाल्यास आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी उपोषणाची दखल घेत कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या हस्ते म्हस्के यांनी उपोषण सोडले. या आंदोलनात माजी सदस्य अनिल ठवाळ, माऊली मोटे, प्रमोद म्हस्के, संभाजी घोडके आणि कार्यकर्ते सहभागी झाले.