
Devendra Fadnavis । राज्यातील युवकांसाठी एक दिलासादायक आणि प्रेरणादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यात आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली असून, यामुळे सोलापूर आणि आसपासच्या भागातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा निर्णय सोलापूरच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवे बळ देणारा ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आपल्या सोलापूर दौऱ्यात बोलताना म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने योग्य जागेची निवड केली की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या माध्यमातून आयटी पार्क उभारले जाईल. आयटी पार्कमुळे स्थानिक पातळीवर हजारो तरुण-तरुणींना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. यामुळे युवकांना मुंबई किंवा पुणे सारख्या महानगरांमध्ये स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही.
सोलापूरमध्ये आधीच चांगले रस्ते, रेल्वे आणि विमानतळ सुविधा उपलब्ध असल्यामुळे नव्या उद्योगांना आवश्यक सुविधा सहज मिळू शकतील. आयटी कंपन्या, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाधारित उद्योगांना प्रोत्साहन मिळाल्यामुळे संपूर्ण परिसराचा कायापालट होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
याच दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1,348 घरांचे वितरणही केले. सोलापूरमध्ये तब्बल 48 हजार घरांची उभारणी प्रस्तावित असून, त्यापैकी 25 हजारांचे काम पूर्ण झाले आहे. ही घरे PPP मॉडेलवर उभारली असून त्यांची किंमत सामान्य माणसाच्या आवाक्यात आहे.